साहेब हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. पदवी देणारी विद्यापीठं ज्ञान देतात; हे विद्यापीठ माणूस घडवतं.
माणसाशी माणसासारखं वागणं
एक माणूस दुसऱ्या माणसाशी किती चांगल्या प्रकारे वागू शकतो, याचं उत्तर साहेबांच्या वागण्या-बोलण्यात मिळतं. साहेबांचा संपर्क समाजातील अत्यंत उच्चपदस्थ आणि अतिश्रीमंत लोकांशी येतो, आणि तेवढाच गोरगरीब माणसांशीही. मी जवळून पाहिलं — दोघांशीही त्यांचं वागणं तंतोतंत एकसारखं असतं. मदतीला धावून जाताना ते कधी विचारत नाहीत की माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, गरीब आहे की श्रीमंत. समोरचा माणूस आहे — एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं असतं, आणि तो कोणीही असो, त्याला सन्मानानेच वागवलं जातं.
२४ तास सुरू असलेला फोन
साहेबांचा मोबाईल एक मिनिटही बंद नसतो. फोन गरजू माणसाचा असो, कार्यकर्त्याचा असो किंवा अगदी अनोळखी माणसाचा — ते मीटिंगमध्ये असोत, एखाद्या अधिकाऱ्यासमोर असोत की मंत्र्यांसमोर — फोन लगेच उचलणार, समोरचं म्हणणं शांतपणे पूर्ण ऐकून घेणार, आणि ते काम होण्यासारखं असेल तर त्याच क्षणी त्याला हात घालणार. माझ्यासमोर कितीतरी वेळा हे घडलं आहे — कोणाचं हॉस्पिटलचं काम, कोणाचं ऑपरेशन, कोणाची अचानक आलेली अडचण — साहेब लगेच उभे राहिले. आणि यासाठीचा प्रवास सतत सुरू असतो — आज मुंबई, उद्या पुणे, परवा दिल्ली, त्यानंतर हैदराबाद.
मी नेहमी गमतीने म्हणतो — मी एक लेक्चर घेतो, तोपर्यंत साहेब हजारो किलोमीटर प्रवास करून परत आलेले असतात. साहेबांचा आजवरचा प्रवास एका रेषेत मांडला, तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत — तब्बल ३ लाख ८४ हजार किलोमीटर — सहज पोहोचून झालं असतं.
शिकण्यासारख्या गोष्टी
- कोणापुढे लाचारी नाही. आयुष्य सन्मानाने जगायचं. साहेबांनी कोणाचीही हुजरेगिरी कधी केली नाही.
- श्रेय स्वतःकडे घ्यायचं नाही. एवढं काम करूनही “मी केलं” असं त्यांच्या तोंडून कधी ऐकलं नाही.
- राजकारणापेक्षा समाजकारण. राजकारणातली मोठी पदं अनेकदा त्यांच्या दारापर्यंत चालत आली; पण त्यांनी समाजसेवाच निवडली.
- भगिनींचा सन्मान. आपल्या भगिनींशी कसं वागायचं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
विश्वमित्र आणि सोशल इंजिनिअर
त्यांच्या कामामुळे अवघा मित्रपरिवार जोडला गेला आहे. म्हणून मी त्यांना “विश्वमित्र” म्हणतो. माणसं जोडणं ही एक कला आहे, आणि ती त्यांना साधली आहे. डॉक्टर, वकील, अधिकारी, प्रतिष्ठित मंडळी, शेतकरी आणि गरीब घरातला सामान्य माणूस — या सगळ्यांना ते “आपले” वाटतात. म्हणून मी त्यांना “सोशल इंजिनिअर” म्हणतो.
हे सगळं सांभाळत असताना त्यांनी कुटुंबही तेवढ्याच निष्ठेने जपलं. मुलांवर चांगले संस्कार केले, उत्तम शिक्षण दिलं, आणि आज ती उच्च पदांवर काम करत आहेत. एवढं सगळं करूनही मी या माणसाला कधी थकलेलं पाहिलं नाही.
काम मोठं, राहणी साधी
मोठं मन, मोठं काम — पण अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तळागाळातल्या माणसाला मदत करणारे, आणि त्याचवेळी गुंडगिरीविरुद्ध, गैरकानूनी कामांविरुद्ध व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे.
“गैरकानूनी काम स्वतः करायचं नाही, आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही.”
त्यांच्या याच कर्तृत्वातून छत्रपती शिवाजी ब्रिगेड ही आज नावलौकिक असलेली संघटना उभी राहिली. त्यांचे गुरू डॉ. टी. एस. भाल साहेब यांचं मार्गदर्शन ते सातत्याने घेत असतात, आणि त्याच मार्गदर्शनातून जगप्रसिद्ध रेड स्वस्तिक सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी उभं केलेलं काम या वेबसाइटवर तुम्हाला पाहायला मिळेल.
ही वेबसाइट का?
साहेब लेखक आहेत, कवी आहेत आणि उत्तम मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. स्टेजवर उभं कसं राहायचं हे मी त्यांच्याकडूनच शिकलो, आणि पुढे महाराष्ट्रातला नामांकित मोटिव्हेशनल स्पीकर झालो. याची खात्री तुम्ही speakersandeep.com वर जाऊन करू शकता.
असा माणूस समाजात फार क्वचित घडतो. येणाऱ्या Gen Z पिढीला, आणि आज काम करणाऱ्या Gen Y व Gen X ना त्यांचा प्रवास कमी पडू नये, दिशा मिळावी — यासाठी साहेबांचा गेल्या ३२ वर्षांचा हा प्रवास एकत्र करून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही वेबसाइट मी स्वतः तयार केली आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहे. माझ्या मनाला हवासा वाटणारा खरा मित्र म्हणजे अशोक शिंदे.
जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभुराजे !
— प्रा. संदीप अमृत पाटीलM.Sc. (Physics), M.S. (Psychotherapy & Counselling), B.Ed.
मुख्य प्रवक्ते, छत्रपती शिवाजी ब्रिगेड • संचालक, विवेकानंद क्लासेस • speakersandeep.com